मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री भैरती सुरेश यांचा थेट सहभाग आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी चिक्कोडी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ यांनी केली आहे.

चिक्कोडी जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर आल्यापासून, प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुडा जमिनीच्या वाटपात स्वत: सिद्धरामय्या यांनी तेथील अध्यक्ष व अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनी अन्य ठिकाणी दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर भाजप या भ्रष्टाचाराचा निषेध करत आंदोलन करत आहे.
या प्रकरणात चार हजार कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार झाला आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी करोडोंची कमाई केली आणि सोनिया गांधींना अल्प रक्कम दिली. या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत . खरे सत्य बाहेर आणायचे असेल तर निःपक्षपाती असलेल्या वरिष्ठ न्यायमूर्तींच्या अधिपत्याखाली न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात सहभागी असलेले मंत्री भैरती सुरेश आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा शांबवी अश्वथपुर, अभय मानवी, अप्पासाहेब चौगला, राजू हरगन्नवर, अमृत कुलकर्णी, संजू पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments