Belagavi

बेळगावात ८ जुलै रोजी पंचमसाली आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन : पंचमसाली स्वामीजी

Share

पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्यासंदर्भात विधानसभा अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी पंचमसाली समाजाच्या सर्व आमदारांच्या घरासमोर पत्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली गुरुपीठाचे अध्यक्ष श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.

आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण मिळावे यासाठी १२ जिल्ह्यात ९ महिने शांततेने लढा दिला. सर्व सरकारांकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. तसेच पंचमसाली समाजाने निवडून दिलेले विधानसौधचे आमदार असलेले लोकप्रतिनिधीही याबाबत आवाज उठवायला विसरले आहेत. सरकार डोळे असूनही आंधळ्या – बहिऱ्याप्रमाणे वागत असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठवणे इतकाच लढा पुरेसा नसून पंचमसाली समाजाच्या आमदारांनी आता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

पावसाळी अधिवेशनात पंचमसाली समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित करण्याची आठवण करून देण्यासाठी ३ जुलैपासून पंचमसाली मागणी पत्र आंदोलन सुरू करण्यात येत आहे. ३ जुलै रोजी धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांच्या घरासमोर, ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुंदगोळचे आमदार एम. आर. पाटील आणि अरविंद बेल्लद यांच्या घरासमोर दुपारी १२ वाजता, त्याचप्रमाणे ७ जुलै रोजी तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी यांच्या घरासमोर पत्र आंदोलन करण्यात येणार आहे.

८ जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील चार आमदारांच्या घरासमोर एकदिवसीय पत्र आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या घरासमोर, दुपारी १२ वाजता कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासमोर, दुपारी ४ वाजता कागवाडचे आमदार राजुगौडा कागे यांच्या घरासमोर तर चिक्कोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या घरासमोर सायंकाळी ७ वाजता पत्र आंदोलन करण्यात येणार आहे. या लढ्यानंतरही लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आमचा लढा आरक्षणासाठी आहे. आमच्यासाठी आरक्षणापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बदल करण्यासंदर्भात कोणताही दबाव आणत नसून आम्ही केवळ आमचा अभिप्राय व्यक्त केल्याचे ते म्हणाले.  या पत्रकार परिषदेस शिवनगौडा पाटील, शिवानंद तंबाकी, सुरेश, संजू नवलगुंद आदी उपस्थित होते.

Tags: