Belagavi

बेळगावमध्ये भरणार सर्वोच्च लोक अदालत

Share

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वतः पक्षकारांकडे येणार आहे. बेळगावमध्ये २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची विशेष अदालत आयोजित करण्यात आली असून यादरम्यान सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती न्यायमूर्ती मुरली मनोहर रेड्डी यांनी दिली.

आज बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, अनेक वर्षांपासून विविध प्रकरणे सर्वोच्च न्यालयात प्रलंबित आहेत. प्रलंबित खटल्यांसाठी दिल्लीला ये – जा करण्यात पक्षकारांच्या वेळ आणि पैसा वाया जातो. हि बाब टाळण्यासाठी तसेच पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी बेळगावात सर्वोच्च लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्यायमूर्ती मुरली मनोहर रेड्डी यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने स्वतः पक्षकारांना स्थानिक पातळीवर भेटून प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, कर्नाटक विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्हा न्यायालयात २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष सर्वोच्च लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान अपघात प्रकरणे, भूसंपादन, फसवणूक, धनादेश बाऊन्स या प्रकरणांसह अनेक खटले निकाली काढण्यात येणार आहेत. पक्षकारांना याठिकाणी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे नसून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खटले निकाली काढण्यात येतील, आतापर्यंत ४७ प्रकरणांचे कामकाज पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकाराने जनतेसाठी उत्तम संधी उपलब्ध करून दिली असून जनतेने आवश्यक कागदपत्रे आणि वकिलांसह सर्वोच्च लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव न्यायमूर्ती मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे.

Tags: