Belagavi

केंद्रीय मंत्र्यांसोबत राज्याच्या महिला विकास मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर चर्चा

Share

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण मंत्री, लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांनी सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन विभागाच्या बळकटीकरणासंबंधी विविध प्रस्ताव सादर केले.

राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यासाठी, मुलांना पोषण आहार आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभागाने आवश्यक पावले उचलली आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण (एलकेजी, यूकेजी) देण्यासाठी आवश्यक निधी वितरीत करण्यासाठी मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना आवाहन केले.

केंद्राच्या भागीदारीतील विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्याला देण्यात येणारे अनुदान तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्याबरोबरच अंगणवाडी केंद्रांसाठी आवश्यक असलेला तांदूळ व गहू तातडीने देण्याबाबत पावले उचलण्याची विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.

अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालये, पिण्याचे पाणी, वीज सुविधा यासह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून अनुदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे हे अनुदान तातडीने देण्यात यावे. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या तालुक्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि विविध सुविधा तातडीने देण्यात याव्यात, असे मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना आवाहन केले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. जी.सी. प्रकाश, मंत्री विशेष कर्तव्य बी.एच. निश्चल यांच्यासह केंद्रीय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: