Belagavi

आईमध्येच केवळ देव दिसतो : डॉ. अल्लम प्रभू महास्वामी

Share

आपण पडल्यावर आपल्याला उचलणारी, संभ्रमात असताना वाट दाखविणारी आणि आपल्या जीवनाला अर्थ देणारी आई ही देवासमान असते असे मत नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी व्यक्त केले.

शिवबसव नगर येथील नागनूर रुद्राक्षी मठाच्या प्रभुदेव सभेत लिंगायत महिला समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अल्लाम प्रभू महास्वामीजी यांनी केले. लिंगायत महिला समाजाच्या नूतन पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या सुनीता पाटील, शारदा पाटील, विद्या गौडा, शोभा पाटील आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी गीतगायन आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. अल्लम प्रभू महास्वामी यांनी आशीर्वचन दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, समाज आपल्या कठीण प्रसंगी देवाचे स्मरण करतो. परंतु आपल्याला जीवन देणाऱ्या आणि पालनपोषण करणाऱ्या आईचे आपण सतत स्मरण ठेवणे गरजेचे आहे. महिला समानतेसाठी संत बसवेश्वरांनी दिलेल्या योगदानामुळे आज महिला निर्भयपणे घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सहभागी होतात. महिलांसाठी घरकाम सांभाळणे आणि सामाजिक व धार्मिक कार्यात पुढाकार घेणे हे आव्हानात्मक काम आहे. मात्र लिंगायत समाज महिला संघटनेच्या महिलांनी हे आव्हान उत्तम पद्धतीने पेलले आहे, याबद्दल स्वामीजींनी त्यांचे कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना लिंगायत समाज महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रेमक्का अंगडी म्हणाल्या की, महिलांनी पुरस्कारासाठी नव्हे तर समाजाच्या भल्यासाठी सेवा केली पाहिजे. आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करणाऱ्या वचनांचा आपण स्वीकार करून आपल्या आयुष्यात ती तत्वे अंगिकारल्यास कुटुंब सुखी होईल, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कावेरी खिलारी, सुकेशिनी पाटील, रत्नप्रभा बेल्लद, शैलजा बिंगे, आशा पाटील यांच्यासह लिंगायत महिला समाजाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रारंभी लिंगायत महिला समाजाच्या अध्यक्षा नयना गिरीगौडा यांनी ईशस्तवन म्हटले. कावेरी खिलारी यांनी सूत्रसंचलन केले. तर सुकेशनी पाटील यांनी आभार मानले. यावेळी महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Tags: