Belagavi

अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, यूकेजी सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती

Share

राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, यूकेजी सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनि सहमती दिली असून सर्व अंगणवाडी केंद्रांची श्रेणी सुधारण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

सोमवारी विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, कल्याण कर्नाटक भाग वगळता नवीन अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक म्हणजेच एलकेजी, यूकेजी शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी केंद्र श्रेणीसुधारित करण्याचे मान्य केले आहे. विभागामार्फत मुलांना गणवेश, पुस्तके व दप्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, शाळांच्या मॉडेलवर बदली प्रमाणपत्र (TC) जारी करण्यासाठी पावले उचलली जातील.

सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, या चिंतेमुळे शिक्षण विभागानेही सरकारी माँटेसरी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असून, याला अंगणवाडी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करून पूर्व प्राथमिक शिक्षण कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्याचा सरकारचा विचार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करण्याबाबत अंगणवाडी सेविकांशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. कार्यरत अंगणवाडी शिक्षिकांपैकी 9000 पदवीधर आहेत, तर 1500 हून अधिक पदव्युत्तर आहेत. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यास कोणतीही अडचण येणार नाही. कोणालाही कामावरून काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस शालेय व प्राथमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: