ARREST

आणीबाणी काळा दिन पाळणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना अटक

Share

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज ५० वर्षे उलटून गेली असून या घटनेचा निषेध व्यक्त करत आज भाजपच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्येही भाजपच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनात भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीचा निषेध व्यक्त करत काँग्रेस कार्यालयात माफी मागण्याची मागणी करणाऱ्या नोटिसा टाकणाऱ्या जिल्हा भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केली. भाजप संविधान बदलेल असे काँग्रेसचे नेते खोटे बोलले, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजप नेत्यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. गेस्ट हाऊस मंदिर ते काँग्रेस भवन पर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘राहुल गांधी यांनी आपली माफी मागावी’ अशा आशयाचे पोस्टर काँग्रेस कार्यालयात लावण्यासाठी जात असताना भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश दोड्डगौडर, संजय पाटील यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांना डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली.

तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, 1975 साली संविधान वाऱ्यावर फेकून काँग्रेस सरकारने आणीबाणी लादली. आणि आता काँग्रेस पक्ष संविधानाबद्दल बोल्ट आहेत. आणीबाणीच्या काळात 1 लाख 40 हजारांना अटक करण्यात आली होती. तुरुंगात पाठवून हिटलरसारखे राज्य करण्यात आले. आणीबाणीला विरोध करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता मौनी बाबा झाले आहेत, सिद्धरामय्या पूर्वीसारखे राहिले नाहीत, असा संताप आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले की, मोदी संविधानापुढे नतमस्तक होऊन संविधानाच्या वाटेवर चालत आहेत. काँग्रेसचा एकही नेता संविधानापुढे झुकलेला नाही, ते भाजप नेत्यांवर खोटे आरोप करत असून खर्गे आणि राहुल गांधी यांनी आधी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार संजय पाटील, मल्लनगौडा पाटील, सुभाष पाटील, माजी महापौर शोभा सोमनाचे, रेश्मा पाटील, नितीन जाधव यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Tags: