Belagavi

अरिहंत हॉस्पिटलमध्ये ७० वर्षांच्या रुग्णावर मायक्रो पेसमेकर उपचार

Share

70 वर्षीय रुग्णाला मायक्रा पेसमेकर इम्प्लांटेशन प्रक्रियेद्वारे पुनर्जन्म देऊन अरिहंत हॉस्पिटलने बेळगावसह उत्तर कर्नाटकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यातून सदर हॉस्पिटलची एक महत्त्वपूर्ण कामगिरी अधोरेखित झाली असून डॉ. प्रभू हलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅब पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या बजावली आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत अरिहंत हॉस्पिटलने अनेक दुर्मिळ आजारांवर यशस्वी उपचार करून रुग्णांना नवजीवन दिले आहे. नुकतेच एका 70 वर्षीय रुग्णाला मायक्रा पेसमेकर इम्प्लांटेशन प्रक्रियेद्वारे पुनर्जन्म देऊन नवी कामगिरी केली आहे. संबंधित रुग्णाला कांही दिवसांपासून चक्कर येणे, 20 सेकंदासाठी शुद्ध हरपणे, यादरम्यान डोळे वरच्या दिशेने वळणे आदी समस्यांमुळे त्रास होत होता. त्यामुळे रुग्णाला तीनवेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एकंदर वय 70 असल्याने त्या रुग्णाला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. तथापी डॉ. प्रभू हलकट्टी यांनी रुग्णाच्या सर्व तपासण्या करून संपूर्ण हार्ट ब्लॉक असल्याचे निदान केले. यामुळे धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेऊन डॉ. प्रभू हलकट्टी व सहकाऱ्यांनी सदर रुग्णाला मायक्रा पेसमेकर बसविला.

मायक्रा पेसमेकर हे हृदयाचे ठोके कमी किंवा अनियमित लय असलेल्या रुग्णांसाठी विकसित केले आहे. यामुळे याचा रुग्णांना मोठा लाभ होतो. तसेच संसर्गाचा धोका कमी व हृदयाला पुनर्प्राप्ती ठोके गतिमान होतात. त्याचबरोबर लीड्सशिवाय ते विस्थापन किंवा फ्रॅक्चरसारखी गुंतागुंत कमी करते. दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित करून मायक्रा पेसमेकर बॅटरीचे आयुष्य 12 वर्षांपर्यंत वाढू शकते. प्रारंभी हृदय ठोके कमी असल्याने रुग्णाला पेसमेकर बसविण्याची गरज होती. त्यामुळे ड्युअल चेंबर सेंट ज्यूड्स पेसमेकर म्हणजेच डीडीडीआर शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा त्रास सुरू झाल्याने तिसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आले असून संसर्ग होण्याच्या जोखमीमुळे रुग्णासाठी मायक्रा पेसमेकरचा पर्याय निवडण्यात आला.

ही अभिनव प्रक्रिया डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. अंबरीश नेर्लीकर व कुशल कॅथ लॅब पथकाचच्या कौशल्याने यशस्वीरीत्या पार पडली. याबद्दल सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णाची विचारपूस करत डॉक्टर व पथकाचे कौतुक केले.

Tags: