Belagavi

स्मार्टसिटी कामकाजाची आम. अभय पाटील यांनी केली पाहणी

Share

आज सकाळीसकाळी शहराचा फेरफटका मारत आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाची पाहणी केली. यावेळी अर्धवट स्थितीत असलेल्या कामकाजाची पाहणी करून आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुन्हा फैलावर घेतले.

रविवारी सायकल वरून फेरफटका मारत अभय पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघातील राणी चन्नम्मा नगर, राघवेंद्र कॉलनी, टिळकवाडी, गुरुवार पेठ, चिदंबरा नगर, शास्त्री नगर येथे दौरा करून एल अँड टी कंपनीच्या कामाची पाहणी केली. आमदारांसह नगरसेवकांनीही सायकलवरून फेरफटका मारल्याचे लक्षात येताच तातडीने नागरिकांनी आमदारांना गाठून तक्रारींचा पाढा वाचला.

यावेळी एल अँड टी कंपनीच्या दिरंगाईमुळे लोक नाराज असून, एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरणार असल्याचा इशारा आमदारांनी दिला. नुकत्याच झालेल्या मनपा सर्वसाधारण बैठकीत देखील आमदारांनी हा मुद्दा उपस्थित करत एल अँड टी कंपनीला मुदत दिली होती. एल अँड टी कंपनीने तातडीने सर्व कामकाज पूर्ण करावीत, असा इशारा आमदारांनी दिला.

अलीकडेच निर्माण केलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून काम अपूर्ण ठेवल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला होता. गॅस पाइपलाइन, पाण्याची पाइपलाइन गळती यासारख्या समस्यांनी आमदारांचे लक्ष वेधले होते. गुरुवार पेठेतील लोकांनी अशास्त्रीय कामांमुळे आपल्या खासगी जलस्रोतात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची तक्रार केली. त्याचबरोबर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (फ्लो)

कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत आमदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. तसेच शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बेळगावच्या जनतेची आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा गाडीशिवाय कुठेही टाकू नये, अशा सूचना आमदारांनी केल्या. अपार्टमेंटच्या वरच्या भागातून लोक रस्त्यावर कचरा टाकत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. शहरात अस्वच्छता पसरविण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी इस्कॉन मंदिराच्या परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ योजने अंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आईच्या नावे एक रोप लावून पुढील तीन वर्षे त्या रोपाचे जतन करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडावी, प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शहरातील या सायकल दौऱ्यात आमदारांसोबत उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, महादेवी राघोजीचे, रमेश मालाईगोळ, वाणी जोशी, गिरीश धोंगडी, जयंत जाधव, राजू भातकांडे आदी उपस्थित होते.

Tags: