NANDAGAD

स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटूनही नंदगडमधील गवळीवाडा दुर्लक्षित; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत

Share

देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण होऊनही नंदगड मधील भागात अद्याप मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. येथील विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय नरकयातना सोसाव्या लागत असून अजून किती दिवस हा भाग दुर्लक्षित राहणार? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

ना पाण्याची सोय, ना दळणवळणाची सोय, ना रस्ते ना इतर मूलभूत सुविधा.. शाळेत जाण्यासाठी 3 किलोमीटरचा जंगल ट्रेक.. रस्त्यांशिवाय रोजची पायपीट हि सारी अवस्था बेळगाव शहरापासून काही अंतरावरच असणाऱ्या खानापुरा तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मधील गवळीवाडा परिसराची आहे!

गेल्या ४० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या नंदगडमधील गवळीवाड्यातील विद्यार्थ्यांचे शाळेला जाण्यासाठी हाल होत असून केवळ २० कुटुंब राहणाऱ्या या गावात जेमतेम १५० नागरिक राहतात. मात्र येथील नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वीज, पाणी याचीही व्यवस्था याठिकाणी उपलब्ध नाही. पावसाळा सुरु झाला कि येथील लोकांना नरकयातना भोगाव्या लागण्याची वेळ येते.

दररोज जवळपास ३ किलोमीटर पायपीट करून येथील विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. परंतु यासाठी ना योग्य रस्ता आहे ना कोणती सुविधा! जंगलातून मार्ग काढत या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागते, इतके मोठे दुर्दैव ७५ वर्षांच्या स्वतंत्र भारताचे नसावे! आज भारत विकासाच्या दिशेने झेपावत आहे. मात्र भारतातील बहुसंख्य नागरी वस्त्यांमधील नागरिकांना जगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतकी धडपड करावी लागते, हा भारतीय स्वातंत्र्याचा अवमान म्हणावा लागेल! २०१७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सौर ऊर्जेच्या दिशेने पाऊल पुढे टाकले. याच अंतर्गत नंदगडमधील अनेक घरांमध्ये सौर उर्जेवरील उपकरणे बसविली परंतु आता त्यांचीही दुरवस्था झाल्याने अनेकांना अंधारातच वेळ घालवावा लागत आहे!

स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही या गावापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात सर्वच शासन अपयशी ठरले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी त्याठिकाणची परिस्थिती पाहिली आहे. मात्र केवळ आश्वासने देत प्रकल्प केवळ कागदावर ठेवण्यात आले आहेत. नंदगड ग्रामपंचायत ही सर्वोत्कृष्ट पंचायत असून राज्यात दुसरा क्रमांक या पंचायतीने पटकाविला आहे. मात्र तरीही याठिकाणी सुविधांच्या नावाची पाटी कोरीच असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.

प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळण्याच्या अधिकाराची येथे पायमल्ली होत असून, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे

Tags: