Belagavi

हिंडलगा ग्रामपंचायतीला पूर्णवेळ पीडीओ द्या : ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

Share

बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीला पूर्णवेळ पीडीओ देऊन जनतेला वेळेवर सेवा देण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे केली.

बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीची लोकसंख्या 25 हजारांहून अधिक आहे. मात्र, शासन हिंडलगा ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ पंचायत विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या कामाला विलंब होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

यासंदर्भात ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल देसाई बोलताना म्हणाले, गावासाठी नियुक्त केलेल्या पीडीओकडे हिंडलगा गावाबरोबरच मोदगा गाव यासह तीन विविध गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे हिंडलगा गावच्या विकासाला खीळ बसत आहे. यासाठी हिंडलगा ग्रामपंचायतीला पूर्णवेळ पीडीओंची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

तीन गावांची जबाबदारी सांभाळणारे पीडीओ एका गावावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. ग्रामपंचायतीत अनेक रिक्त पदे आहेत. मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, यासाठी लागणारा संगणक उतारा पुरविणारा कर्मचारी याठिकाणी नाही. या कारणांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून हिंडलगा ग्रामपंचायतीला पूर्णवेळ पीडीओ द्यावा, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य डी.बी. पाटील यांनी केली.

सदर मागणीचे निवेदन हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Tags: