Belagavi

उसाच्या थकबाकीसाठी हुक्केरीतील शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

आधीच दुष्काळामुळे अडचणीत आलेले जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता कारखान्याने उसाचे पैसे न दिल्याने आणखी अडचणीत आल्याचा आरोप कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी यांनी केला.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने द्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांच्या मालकीच्या हिरा साखर कारखान्यातुन शेतकऱ्यांची ९० कोटींची थकबाकी असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला. यादरम्यान शेतकरी आणि पोलिसात बाचाबाचीचा प्रकार घडला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी असा आग्रह करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादकांचे 600-700 कोटी थकीत आहेत, बेळगाव जिल्ह्यातील 6 साखर कारखान्यांकडे विशेषत: संकेश्वर येथील हिरा साखर कारखान्याचे 90 कोटी थकीत आहेत. जोवर थकबाकी देण्यात येत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदार उसाची बिले अदा करत नाहीत. हिरा साखर कारखान्याकडून आणखी ८४ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कत्ती, आमदार निखिल कत्ती हे होते. परंतु तरीही थकबाकी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. एमके हुबळी साखर कारखान्यातूनही १० कोटींची थकबाकी असल्याचे ते म्हणाले.

आंदोलनात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुनप्पा पुजारी, प्रकाश नाईक यांच्यासह शेकडो शेतकरी नेते सहभागी झाले होते.

Tags: