बकरी ईद निमित्त बेंगळुरू येथील चामराजपेठ मधील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी देखील उपस्थिती दर्शवून नमाज अदा केली.

देशभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नमाज पठण करण्यात आले. बेंगळुरू चामराजपेठ येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमवेत मंत्री जमीर अहमद यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, आज देशभरात मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण साजरा करत आहेत. समस्त मानवजातीच्या भल्यासाठी नमाज पठण करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी सामाजिक सलोखा आणि बंधुत्वभावाचा संदेश देत मुख्यमंत्र्यांनी बकरी ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कि भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. सर्व भाषा, धर्मांना समानतेची वागणूक देणाऱ्या आपल्या देशात माणुसकीला अधिक प्राधान्य दिले जाते. सामाजिक सहिष्णुता, एकमेकांप्रती आदर, प्रेम या भावना जपल्यास देश आणि समाज समृद्ध होईल. आमचा संविधानावर विश्वास असून भेदभावाला याठिकाणी थारा नाही. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे आम्ही हे काम भेदभाव न करता पार पाडू, यासाठी आपल्याला शक्ती मिळो, तसेच उत्तम पीक पाण्यासाठी प्रार्थना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


Recent Comments