न्यायप्रविष्ट असणाऱ्या सीमाप्रश्नासंदर्भात तसेच सीमावासियांच्या समस्यांसंदर्भात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी येथे सीमाकक्ष स्थापन करण्यात आला असून या कार्यालयाचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांसाठी निर्यात साठा केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समिती शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या सीमासमन्वयक मंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण – पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्रातील सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सीमेवरील शिनोळी या गावात शेतकऱ्यांच्या मालासाठी निर्यात साठा केंद्र स्थापन करावे तसेच शिनोळी येथील सीमाकक्षाचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, अशा मागण्या करत सीमासमन्वयक मंत्र्यांकडे निवेदन सादर केले. म. ए. समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती नेते महादेव पाटील, सागर पाटील, जयराम मिरजकर यांच्या उपस्थितीत सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्यात आली. यावेळी सदर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या मागण्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडू तसेच पणन मंत्री अब्दुल सत्तर यांच्याकडे प्रस्ताव मांडू असे आश्वासन दिले. तसेच आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेल्या शिनोळी येथील सीमाकक्षाचे उद्घाटन देखील लवकरात लवकर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच सदर मागण्यांचे निवेदन पुन्हा एकदा सादर करण्यासाठी समिती शिष्टमंडळाने जुलै महिन्यात मुंबई येथे यावे, अशी सूचनाही मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
बेळगाव, खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला देशविदेशात पाठविण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या शिनोळी या गावात निर्यात साठा केंद्र स्थापन करण्यात यावे, या केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सीमाभागातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, तसेच मालाची निर्यात करण्यास मदत होईल, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. असे या निवेदनात म्हटले आहे.


Recent Comments