farmers

हिरण्यकेशी साखर कारखान्याकडे थकीत ऊसबिलाची मागणी

Share

कत्ती कुटुंबियांच्या मालकीचा असणारा हिरण्यकेशी साखर कारखाना तोट्यात असून या कारखान्याने २०२२ – २३ सालातील शेतकऱ्यांची ऊसबिले थकविली आहेत, सदर थकीत बिले तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करत माजी मंत्री शशिकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री शशिकांत नाईक म्हणाले, राज्यातील अनेक साखर कारखानदारांना शेतकऱ्यांची बिले भरायची आहेत. त्यानुसार बेळगाव मधील संकेश्वर येथील हिरण्यकेशी साखर कारखान्याने ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचे सुमारे 86 कोटी रुपये अद्याप अदा केले नसून हा कारखाना तोट्यात असल्याचा दावा त्यांनी केला. साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नोटीस बजावून हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

यानंतर त्यांनी विविध भागातून आलेल्या शेतकरी नेत्यांशी आंदोलनाच्या स्वरूपाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा शेतकरी नेते झियाउल्ला वंटमुरी यांनी दिला.

शेतकरी संघटनेचे नेते गोपाळ मरबसन्नवर म्हणाले की, राज्यातील आदर्श आणि नफ्यात असलेल्या हिरण्यकेशी साखर कारखान्याला आज तोट्यात जावे लागले आहे. परदेशात मौजमजा करणाऱ्या हुक्केरीच्या आमदारांमुळेच कारखाना तोट्यात सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांची थकीत बिले न दिल्यास १५ जून रोजी कारखान्याला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विविध शेतकरी संघटनेचे नेते, सुभाष नाईक, वीरुपाक्षी मरेन्नावर, संजू हवण्णावर, सलीम मुल्ला, महम्मद बाडकर, नागराज हादिमनी, काडाप्पा लक्कुंडी, बाळाप्पा अक्कतंगेरहाळ, तम्मण्णागौडा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: