Politics

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला पदभार

Share

 

लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजयी झालेले प्रल्हाद जोशी यांना आणखी एक केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. त्यांनी आज ‘अन्न आणि ग्राहक व्यवहार तसेच नवीकरणीय ऊर्जा’ या खात्याची जबाबदारी स्वीकारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये दुसऱ्यांदा कॅबिनेट-स्तरीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीपाद नाईक यांनी प्रल्हाद जोशी यांना नव्या जबाबदारीची सूत्रे सोपविली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्यांचा कार्यभार प्रल्हाद जोशींनी स्वीकारला.

केंद्रीय मंत्री म्हणून दुसऱ्यांदा नवीन खात्यांचा कार्यभार सांभाळणारे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज त्यांचे कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करून नव्या वाटचालीला सुरुवात केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 2047 पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचा आमचा निर्धार आहे. भारताला नवीन आणि नवीकरणीय क्षेत्रात जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही नवीन योजना आणि कार्यक्रम सुरू ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: