शिक्षणाला वय नसतं, माणूस आयुष्यभर विद्यार्थीच राहतो, असं म्हणतात.. याच उदाहरण विजयपूरमध्ये पाहायला मिळालं. येथील बीएलडीई संस्थेच्या जे एस एस महाविद्यालयात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित पदव्युत्तर परीक्षेत ज्येष्ठ नागरिकांनी परीक्षा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागासाठी परीक्षा पार पडल्या. एम. ए. इंग्लिश या विषयासाठी पार पडलेल्या परीक्षेत बागलकोट जिल्ह्यातील इळकल तालुक्यातील गुडूर येथील ८३ वर्षीय पी. एन. मडिवाळ आणि शिवमोग येथील ५५ वर्षीय कला शाखेचे निवृत्त प्राध्यापक नागनगौडा पाटील यांनी उपस्थिती दर्शवत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सेवानिवृत्त प्राध्यापक पी. एन. मडिवाळ यांनी सांगितले, कि आपण आपल्या मुलीसोबत पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरला होता. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून एम. ए. इंग्लिश या अभ्यासक्रमासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. प्राध्यापक पेशात असताना दररोज अभ्यास करून ज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवी पुस्तके वाचणे, संशोधनात्मक अभ्यास करणे याचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो. यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
परीक्षा पार पडल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. रविकांत कमळेकर, संगीतकार डॉ. मंजुनाथ कोरी, निंगय्या बसय्या, पी. एम. मडीवाळ व नागनगौडा ए पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
Recent Comments