बेळगाव मधील एपीएमसी रोडवरील सातत्याने निदर्शनात येणाऱ्या असुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून या भागातील ड्रेनेज, गटारींवरील झाकणे सातत्याने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यासह या भागात अनेक असुविधांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहरातून, बॉक्साईट रोड, शाहूनगर, आझम नगर, संगमेश्वर नगर, नेहरू नगर यासह या परिसरातून पुढे तालुक्यातील विविध गावात राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या एपीएमसी रोडवर सातत्याने अनेक असुविधा उद्भवत असून या परिसराकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
या परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा कोणताच उपयोग होत नसून पदपथावरील गटारींची झाकणे सातत्याने चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील गटारींची झाकणे उघडीच असल्याकारणाने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या परिसरातून बहुसंख्य नागरिक मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडतात. तसेच पायी चालत जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. या भागात काही ठिकाणचे पथदीप सुरु तर काही ठिकाणचे पथदीप बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंदाज न आल्याने उघड्या गटारींमध्ये तोल जाऊन पडण्याची शक्यता आहे. काही सुजाण नागरिकांनी उघड्या गटारींवर झाडांच्या फांद्या टाकून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या भागात एपीएमसी पोलीस स्थानक देखील आहे. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र देखील आहे. एपीएमसी मध्ये येणाऱ्या अवजड वाहनांची संख्यादेखील लक्षणीय आहे. परंतु एपीएमसी परिसरात असणाऱ्या सिग्नल यंत्रणेकडेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. चोहोबाजूंनी येणाऱ्या वाहनांना कोणतीच शिस्त नसल्याने या भागात अनेक अपघात देखील घडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा कंटेनरची धडक बसून अपघात झाला आहे. यादरम्यान काही दिवस सुरु करण्यात आलेली सिग्नल यंत्रणा पुन्हा ठप्प झाली असून या भागातील असुविधांकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासन यांच्यामधील असमन्वयामुळे एपीएमसी परिसरातील असुविधा वाढत चालल्या असून येथील समस्यांकडे प्रशासन आणि स्मार्टसिटी कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Recent Comments