कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील टायर आणि खताच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले असून दोन्ही दुकानात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत सुमारे ८५ लाखांचे नुकसान झाले आहे.

शिरगुप्पी गावात शुक्रवारी पहाटे शिवशक्ती विलर्स गॅरेज या दुकानाला लागलेल्या आगीत दोन मारुती कार, एक फिटिंग मशीन, डिस्क मशीन, एअर कॉम्प्रेसर फिल्टर मशीन, 250 लिटर इंजिन ऑईल, कॉम्प्युटर एसी सीसीटीव्ही व इतर मौल्यवान सामुग्री जळून खाक झाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. रायबाग, उगार, चिकोडी, निपाणी येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने दाखल होत आग आटोक्यात आणली. यामध्ये अग्निशमन दलाचे बी. एल अनुराग, किरण यादव, अनिल जमदाडे आदी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

याच दुकानाशेजारी असणाऱ्या जीवन ॲग्रोटेक स्टोअरमध्ये देखील आगीने पेट घेतल्याने खत व रसायनांचे दुकान असलेल्या जीवन ॲग्रोटेकचेही नुकसान झाले आहे. खतांमध्ये असलेल्या रासायनिक द्रव्यांमुळे आगीने काही क्षणातच मोठा पेट घेतला. यामध्ये या दुकानातील १७ लाख रुपयांची रासायनिक खते, ५ लाख रुपये किमतीची औषधे, १५ लाख रुपयांचे इतर साहित्य जाळून खाक झाले आहे अशी माहिती दुकान मालक सोपान हरिबाळ यांनी दिली.
शिवशक्ती या दुकान संचालकांनी झालेल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, कर्ज घेऊन आपण हा व्यवसाय सुरु ठेवला आहे. आपल्या दुकानात १० तरुण काम करतात. आज झालेल्या दुर्घटनेत आपले मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. तर खतांचे व्यापारी सोपान लाटवडे यांनी ही घडलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत आपल्याला सरकारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
कर्नाटक डिफेन्स फोरमचे कागवाड तालुका मानद अध्यक्ष शिवानंद नवनाळ म्हणाले की, हेस्कॉम विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना शिरगुप्पी मध्ये वारंवार घडत आहेत. शिरगुप्पीमधील दोन्ही नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले असून आज झालेल्या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मस्थळ संघाच्या वीरेंद्र हेगडे यांच्या वतीने दोन्ही नुकसानग्रस्तांना सहकार्य मिळावे असे आवाहन नवनाळ यांनी केले.

सकाळसकाळी घडलेल्या आगीच्या घटनेदरम्यान अनेकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. कागवाड मध्ये अग्निशमन दल देखील योग्यपद्धतीने कार्यरत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. सातत्याने असे प्रकार होत असून जनतेला याचा फटका बसत आहे. काही महिन्यांपूर्वी या भागात असणारी अग्निशमन दलाची वाहने अन्यत्र हलविण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत मदत मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.


Recent Comments