Belagavi

बेळगाव लोकसभा मतदार संघावर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार?

Share

 

 

येत्या ४ जून रोजी देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोट्यवधी जनतेच्या नजरा या निकालाकडे खिळल्या असून कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान बेळगाव लोकसभा मतदार संघावर कुणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार? याची चर्चा आता बेळगावमध्ये सुरु झाली आहे…..

बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगलमधून भाजपाला पाठिंबा असल्याचा भाजपचा विश्वास
लिंगायत समाज भाजपच्या पाठीशी असल्याचा भाजपचा दावा
काँग्रेसच्या हमी योजनांचा परिणाम निकालावर दिसण्याची शक्यता

व्हॉइस : बेळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी नवोदित आणि दिग्गजांमध्ये लढत झाली असून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपकडून, तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. अंतिम क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली असून निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

राजकारणातला मोठा अनुभव असलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघात रणनीती आखून लढत दिली आहे. प्रचंड अंतर्गत विरोध असूनही हायकमांडच्या पाठिंब्याने आणि देशभरातील मोदी लाटेच्या सहकार्याने बेळगाव लोकसभा निवडणूक लढविली आहे. याचप्रमाणे मराठा समाजाची आणि लिंगायत समाजाची मतेही आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाला बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल आणि बेळगाव उत्तर मतदार संघाचा भरघोस पाठिंबा मिळेल आणि बेळगाव लोकसभा मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

‘गृहलक्ष्मी’चा लाभ काँग्रेसला होणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या पाच हमी योजनांमुळे काँग्रेसचे पारडे जड होईल अशी चर्चा राज्यात रंगू लागली आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघात या निवडणुकीत राजकारणात नवख्या असणाऱ्या मात्र राजकीय पार्श्वभूमी भक्कम असणाऱ्या मृणाल हेब्बाळकर यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आली होती. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मैदानात उतरून प्रचार केल्याने काँग्रेसच्या दिशेने वातावरण निर्मिती झाली होती. हमी योजना आणि काँग्रेस नेत्या, आमदार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची राजकीय कारकीर्द पाहता विजयाचा झेंडा काँग्रेसच्या दिशेने फडकण्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजकीय वरचष्म्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने दमदार कामगिरी दाखवली आहे. हेब्बाळकरांनी जगदीश शेट्टर यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्याला अत्यंत सावधपणे तगडी टक्कर देत निवडणूक लढविली आहे.

महिलांसाठी अंमलात आणलेल्या गृहलक्ष्मी योजनेमुळे अधिकाधिक महिलांची मते काँग्रेसच्या दिशेने पडल्याचे मत राजकीय जाणकारातून व्यक्त होत असून गृहलक्ष्मी योजनेमुळे काँग्रेसच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात मते पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

एकंदरीत चित्र पाहता भाजपच्या उमेदवारीवरून सुरु झालेला गोंधळ दुसरीकडे राज्यात लागू करण्यात आलेल्या हमी योजना यामुळे निर्णायक मते काँग्रेसच्या बाजूने झुकतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वरवर जरी हे चित्र दिसत असले तरी देशातील मोदी लाट आणि हिंदुत्वाचा मुद्दा यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षात थेट आणि बरोबरीची लढत झाल्याचेही राजकीय अभ्यासकांचे मत आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला आहे हे येत्या ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

Tags: