Dharwad

ग्रामपंचायत सदस्याने केली भाचीला मारहाण!

Share

 

मालमत्तेच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याने आपल्या भाचीला मारहाण केल्याचा प्रकार धारवाडमध्ये घडला आहे.

जनता चुकत असेल तर त्याठिकाणी समजूतदारीने वागण्याची आशा आपण लोकप्रतिनिधींकडून करतो. मात्र लोकप्रतिनिधींनीच जर कायदा हातात घेतला तर जनतेने कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित होतो. असाच प्रकार धारवाड तालुक्यात घडला असून मालमत्तेच्या वादातून आपल्या बहिणीच्या मुलीवर हात उचलण्याचा प्रकार ग्रामपंचायत सदस्यांकडून झाला आहे.

धारवाड तालुक्यातील कनकूर या गावातील ग्रामपंचायत सदस्य मारुती पवार यांनी मालमत्तेच्या वादातून बहीण आणि बहिणीच्या मुलीला मारहाण केली आहे. इतकेच नाही तर पंचायत सदस्याचे नातेवाईक रामचंद्र नामक व्यक्तीनेही तरुणीला मारहाण केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ याचठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला असून ग्रामपंचायत सदस्याच्या या वर्तणुकीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांशी अशापद्धतीने वर्तणूक करणे योग्य आहे का? असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली असून व्हिडीओ समोर येताच नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: