Agriculture

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना! बियाणांचे दर वधारले!

Share

 

खरीप हंगामासाठी बळीराजाची धडपड सुरु असून मागील वर्षी पावसाने हात दिल्याने हवालदिल झालेला शेतकरी यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे खुश झाला आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलत असताना पेरणीच्या आधीच बियाणांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

खरीप हंगाम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. मात्र बियाणांच्या दरात यंदा किरकोळ वाढ झाल्याने शेतकऱ्याची चिंतादेखील वाढली आहे. खरीप हंगामात भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन, तंबाखू, तूर आदी बियाणांची पेरणी आणि लागवड होते. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बियाणांची गरज भासते. मात्र बियाणांच्या दरात वाढ झाल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कृषी विभागाकडून सवलतीच्या दरात वितरित केलेल्या बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विविध पेरणी बियाणांची किंमत 2 ते 61 रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढली आहे. सोयाबीन बियाणांची किंमत 7 रुपये प्रति किलोने कमी झाली असून इतर सर्व बियाणांच्या किमती वाढल्या आहेत.

राजगिरा, उडीद, तूर इत्यादी बिया 5 किलोच्या पॅकेट बॅगमध्ये, 30 किलो बॅगमध्ये सोयाबीन आणि शेंगदाणे, 4 किलोच्या पॅकेटमध्ये चवळी येतात. वेगवेगळ्या बियांच्या एका बागमागे 60 ते 304 रुपये इतके दर वधारले असून केवळ 5 एकरासाठी सवलत दिली जात असून उर्वरित बियाणे बाजारभावाने खरेदी करावे लागणार आहे.

Tags: