प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या घरावर दगडफेक करून तिला धमकावणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे .
बेळगाव तालुक्यातील किणये येथे हा प्रकार घडला आहे . या प्रकरणी तीप्पाण्णा सुभाष डुकरे (वय २५ ) रा . किणये या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे . २१ मे रोजी सायंकाळी याच गावातील तरुणी घरी एकटीच असताना तीप्पाण्णाने तिच्या घरावर दगडफेक करून , शिवीगाळ केली होती .
दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या होत्या . यासंबंधी दुसऱ्या दिवशी २२ मे रोजी सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता . या घटनेनंतर तीप्पाण्णा फरार झाला होता . बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक नचिकेत जनगौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीप्पाण्णाला अटक केली . सुरुवातीला पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती . मात्र पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांनी आदेश देताच एफआयआर दाखल करण्यात आला .
किणये गावातील ही तरुणी , बेळगावात बीकॉम चे शिक्षण घेत आहे . तीप्पाण्णाने तिचा पाठलाग करीत प्रेमासाठी तगादा लावला होता . तिने नकार देताच गेल्या वर्षीही त्याने त्रास दिला होता . त्याच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणी आणि तिची आई तब्बल आठ महिने गाव सोडून नातेवाईकांच्या घरी राहत होते . गेल्या वर्षी देखील या तरुणीने तीप्पाण्णाच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती .


Recent Comments