म्हैसूरमध्ये गॅस सिलिंडर गळतीमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
म्हैसूर येथील यरगनहळ्ळी येथे गॅस सिलिंडर गळतीमुळे झालेल्या घटनेत घरात झोपलेल्या चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.. घरात इस्त्रीचा व्यवसाय करणारे कुमारस्वामी कुटुंबातील कुमारस्वामी (४५), पत्नी मंजुळा (३९) आणि त्यांच्या दोन मुली अर्चना (19) आणि स्वाती (१७) या चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. घरात असणाऱ्या तीन सिलिंडर पैकी १ सिलिंडरला गळती लागल्याने हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत कुमारस्वामी हे मूळचे कडूर तालुक्यातील सखरायपट्टणम येथील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी कुटुंबीयांसह एका नातेवाईकाच्या लग्नाला जाऊन सोमवारी रात्रीच सर्वजण परतले. सोमवारी गाढ झोपी गेलेल्या या कुटुंबाने सकाळ पाहिलीच नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना अनेकवेळा फोनदेखील केला परंतु घरातून कोणताच प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांना फोन करून विचारणा करण्यात आली. यावेळी शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
१० बाय २० च्या घरात वारा खेळण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत झालेल्या गॅस गळतीमुळे हि दुर्घटना घडली आहे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. गॅस गळतीमुळे स्फोट होऊन मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, गॅसगळतीमुळे गुदमरून चार जणांचा मृत्यू होण्याची ही अलीकडच्या काळात पहिलीच वेळ आहे. गॅसचा वापर होत नसताना गॅस बंद करण्यासाठी गॅस कंपन्या नेहमीच जनतेला जागरूक करत असतात, यामुळे जनतेने देखील अशा दुर्घटनांपासून वाचण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.
Recent Comments