यंदा अधिक पावसाचा अंदाज असल्याने खानापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.

खानापूर तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायत अंतर्गत पांढरी नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या जागेची त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी सीईओ राहुल शिंदे यांनी, पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असणाऱ्या लोंढा गावातील पांढरी नदी काठावरील रहिवाशांना स्थलांतरित करावे, गावात सुरक्षित ठिकाणी केअर सेंटर सुरू करून जेवण व राहण्याची तसेच अन्य व्यवस्था करण्यात यावी, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व आशा वर्कर यांच्या मदतीने वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. लोंढा गावात २०१९ ते २०२१ या कालावधीत पांढरी नदीला आलेल्या पुरामुळे घरे गमावलेल्यांना राजीव गांधी महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावातील शासकीय जमिनीत भूखंड देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीसह इतर नद्या आणि नाल्यांना पूर येण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष पुरविण्याची सूचना राहुल शिंदे यांनी केली.

गावातील आवश्यक ठिकाणी केअर सेंटर सुरू करावीत. पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांची यादी तयार करून त्या भागातील जनतेचे केअर सेंटरवर स्थलांतर करण्यात यावे, कुशल जलतरणपटूंची, स्वयंसेवकांची यादी ठेवावी, अन्नधान्याची तजवीज करावी, तसेच औषधोपचाराच्या व्यवस्थेसह इतर आवश्यक व्यवस्था कराव्यात, अशा सूचना सीईओंनी केल्या.
यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जहागिरदार, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायतराज सहायक संचालक विजया कोतीन, ग्रामविकास अधिकारी शिवानंद खोत, अध्यक्ष नीलकंठ उसपकर, तांत्रिक सहाय्यक बसवराज होसमनी, विविध तालुकास्तरीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments