फीचे पैसे न भरणाऱ्यांना एसएसएलसी हॉल तिकीट दिले जाणार नाही असा फतवा शालेय व्यवस्थापनाने काढल्याने अथणी तालुक्यातील सत्ती गावातील निहाल निसार डांगे हा विद्यार्थी दहावी परीक्षेपासून वंचित राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दहावी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांपासून पालकवर्ग, शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाकडून कसून तयारी केली जाते. कर्नाटकात दहावी परीक्षा पार पडल्यानंतर दहावी परीक्षेचे निकाल देखील नुकतेच जाहीर झाले. मात्र अथणी येथील महिषवाड नजीक असलेल्या पद्मावती इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अजब कारभारामुळे एका विद्यार्थ्याला दहावी परीक्षेपासूनच वंचित राहण्याची वेळ आली आहे.
अथणी तालुक्यातील सत्ती गावातील निहाल निसार डांगे असे या विद्यार्थ्याचे नाव असून शालेय फी न भरल्याने त्याला हॉलतिकीटच देण्यात आले नाही. हॉलतिकीट मिळविण्यासाठी शालेय व्यवस्थापनाकडे अनेकवेळा विनंत्या करूनही उर्वरित फी न भरल्याने सदर विद्यार्थ्याला हॉलतिकीटच न मिळाल्याने दहावी परीक्षेपासून हा विद्यार्थी हुकला आहे. उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत असून शालेय व्यवस्थापनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्यासोबत झालेल्या या प्रकारासंदर्भात तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि स्थानिक बीईओंकडे दाद मागण्यात आली आहे.
Recent Comments