बेळगाव स्मार्ट सिटीमधील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात आणखी एक तक्रार पुढे आली असून शहरातील बसवेश्वर सर्कल नजीक असणाऱ्या सिग्नल यंत्रणेमुळे नागरिक गोंधळात पडत आहेत.
शहरातील गोवावेस परिसर म्हणजेच बसवेश्वर सर्कल नजीक असणाऱ्या सिग्नल यंत्रणेची तीन तेरा अशी अवस्था झाली असून वाहनधारकांना गोंधळात टाकणाऱ्या सिग्नलमुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
प्रभाग क्रमांक २९ मधील महात्मा फुले रोड, कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स याचप्रमाणे बेळगाव शहरातून अनगोळ मार्गे जाणारे असे चार रस्ते या ठिकाणी मिळाले आहेत. याठिकाणी चौकात असणाऱ्या सिग्नल यंत्रणेत योग्य पद्धतीने सिग्नल न मिळाल्याने वाहनधारक गोंधळात सापडत आहेत. एकाच वेळी दोन्ही बाजूच्या रस्त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याने दोन्ही बाजूचे लोक एकाचवेळी निघत आहेत. या प्रकारामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असता ट्राफिक सीपीआय जगदेवाप्पा, इएसआय परशुराम हासन्नवर तसेच सिग्नल सुपरवायझर विक्रम पाटील, युवराज हावळाणाचे आदींनी भेट देऊन समस्या जाणून घेतली.

या भागातील सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या भागातून दररोज मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांकडून केली जात आहे.


Recent Comments