सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने साक्षर बनणे गरजेचे आहे असे मत आमदार असिफ सेठ यांनी व्यक्त केले.
आज बेळगावमधील अमन नगर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या मॉंटेसरी पूर्व प्राथमिक शाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी आमदार फिरोज सेठ, आमदार असिफ सेठ, पुणे येथील आझम कॅम्पसचे ट्रस्टी तनवीर इनामदार, अमन नगर येथील नेते अझीम हाकीम, फते अहमद साबखान, विविध मॉन्टेसरीच्या अध्यक्ष रोहिना देसाई, संचालक राकेश चव्हाण, उद्योजक भरामगौडा राजू पाटील, ऍड. प्रवीण मोतीमठ, उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक महंमद शफी मकानदार, एपीजे अब्दुल कलाम कोळणीचे चेअरमन रफिक पटवेगार आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या आणि मुलांच्या हस्ते आकर्षक वर्गखोल्यांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. आज मुलांना उत्तम शिक्षण मिळाले तर उद्या उत्तम समाजाची निर्मिती होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

याचप्रमाणे माजी आमदार फिरोज सेठ यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करूनच यशाच्या शिखरावर जाता येते. केवळ शैक्षणिक संस्था स्थापन करणे पुरेसे नाही. अशा शिक्षण संस्था वाढविणे आणि समाज साक्षर बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साक्षरता ही एका चांगल्या समाजाची सुरुवात आहे. तसेच शाळा कायद्यानुसार चालविणे गरजेचे आहे, असे मतही माजी आमदार फिरोज सेठ यांनी व्यक्त केले.
पुण्याचे आझम कॅम्पसचे ट्रस्टी तन्वीर इनामदार यांनी, शाळा हे मुलांचे चांगले भविष्य घडवण्याचे केंद्र असले पाहिजे. तरच शाळेतील मुलांची संख्या वाढेल. साक्षरता हा मुलांच्या भविष्याचा पाया असल्याचे सांगितले.

माजी मुख्याध्यापक मोहम्मद शफी मकानदार म्हणाले की, शहरी भागात शिक्षण केंद्रे जास्त आहेत. मात्र, शहरी भागापासून दूर असलेल्या ठिकाणी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विविध मॉंटेसरी पूर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments