Dharwad

अबब! दहा हजारांचा आंबा!

Share

धारवाडमध्ये सुरु असलेल्या आंबा महोत्सवात जपानच्या मियाझाकी जातीचा आंबा प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आला असून या आंब्याची किंमत तब्बल १०००० रुपये इतकी आहे.

१४ ते १६ मे या दरम्यान धारवाडमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे आंबे प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले असून या महोत्सवात जपानच्या मियाझाकी आंब्याचाही समावेश आहे. या आंब्याची किंमत तब्बल १० हजार रुपये इतकी असून हा आंबा या महोत्सवात लक्षवेधी ठरत आहे.

धारवाड शहरातील रेल्वे स्टेशन रोड येथील फलोत्पादन विभागाच्यावतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून पुढील तीन दिवस कालावधी वाढविण्यात आला असून या मेळाव्यात जपानच्या मियाझाकी जातीच्या आंब्याचेही प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

धरवाडमधील कलकेरी गावातील आंबा बागायतदार प्रमोद गावकर यांनी २०१२ साली महाराष्ट्रातून मियाझाकी जातीच्या आंब्याच्या झाडाची खरेदी केली होती. ते झाड आपल्या शेतात वाढवून काही वर्षानंतर आंबा उत्पादन घेण्यास सुरुवात केली. या जातीच्या आंब्याच्या उत्पादनापासून लाखो रुपये कमावल्याची माहिती प्रमोद गावकर यांनी दिली.

१९८५ सालापासून आंबा लागवड आणि विक्रीमध्ये गुंतलेले प्रमोद गावकर यांनी जपानी जातीच्या आंब्याची अधिक माहिती देताना सांगितले, मूळ जपानी झाड असलेल्या या आंब्याच्या झाडाने स्थानिक हवामानाशी चांगले जुळवून घेतले. या झाडाला एका हंगामात जास्तीत जास्त 14 फळे येतात. या हंगामातील डझनभर आंबे सुमारे अडीच लाख रुपयांना विकले गेले. हा आंबा दुर्मिळ असून आरोग्यासाठी अतिशय चांगला असल्याने याला उत्तम दर मिळत असल्याचेही प्रमोद गावकर म्हणाले.

कोप्पळ येथील ग्राहकाला १० हजार रुपये दराने आंबा विक्री करण्यात आली असून राज्यात या आंब्यासाठी कमी खरेदीदार उपलबध असल्याचे गावकर म्हणाले. या जातीच्या आंब्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. जीवनसत्त्वे अ, ब आणि क असतात. फळांचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठीही चांगले असते. इतर उत्पादकांमध्ये सुरक्षितता आणि सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी येथे फक्त एक फळ प्रदर्शित केल्याची माहिती गावकर यांनी दिली. मियाझाकी जातीचा आंबा जांभळ्या आणि गडद लाल रंगाचा असतो.या आंब्याला सूर्याची अंडी असेही संबोधले जाते. या आंब्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फळ सुमारे 200-350 ग्रॅम असते, अशी माहितीही प्रमोद गावकर यांनी दिली.

Tags: