सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात सुरु असून लाखो भाविक या यात्रोत्सवात सहभागी होत आहे . काल अक्षतारोपण झाल्यानंतर दुपारी रथोत्सवाला सुरुवात झाली . भंडाऱ्याच्या उधळणीत उदो ग आई उदो च्या गजरात गल्लोगल्ली श्री महालक्ष्मी देवीचा व्हन्नाट पार पडला . यानंतर देवी रथावर विराजमान झाल्यानंतर देवीचा रथोत्सव प्रारंभ झाला .
तब्बल अठरा वर्षानंतर बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे श्री महालक्ष्मी जत्रा होत आहे . या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे . काल मंगळवारी सकाळी सूर्योदयानंतर अक्षतारोपण झाल्यानंतर दुपारी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून , गाऱ्हाणे घालण्यात आले . त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या व्हन्नाट ला सुरुवात झाली . यावेळी भंडाऱ्याची उधळण करीत देवीचा जयजयकार करण्यात येत होता .

गावातील गल्ल्या भंडाऱ्याने माखून गेल्या होत्या . देवीला खेळवण्यासाठी भक्तांचा महापूर लोटला होता . अत्यंत भक्तिमय वातावरणात , देवीचा जयजयकार करीत सायंकाळी देवीला रथावर विराजमान करण्यात आले . त्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला . गावातील चावडी गल्लीतील शिवानंद के कुलकर्णी यांच्या घरापर्यंत रथ ओढण्यात आला . रात्री तेथेच रथ वस्तीला ठेवण्यात आला . उदो ग आई उदो च्या जयघोषाने वातावरण भरून गेले होते . जत्रेसाठी आलेले पै पाहुणे देखील या रथोत्सवात सहभागी झाले होते .


Recent Comments