Vijayapura

आलमट्टी जलाशयातून विजापूरला पाणी सोडण्याची मागणी

Share

दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजापुरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आज विजयपूरमधील शेतकऱ्यांनी आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तलाव आणि कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली.

उन्हाच्या तीव्र झळा सोसत पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसह येथील जनताही पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनाची समस्या ऐरणीवर आली असून या भागाला आलमट्टी जलाशयातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील आलमट्टी जलाशयातून पाणी सोडण्याचे आदेश देऊनही आदेशाची अम्मलबजावणी करण्यात आली नाही. यावेळी आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

विजापूर जिल्ह्यातील नागठाण या राखीव मतदारसंघातील शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी तलाव भरण्याची मागणी करत गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. कालव्यात पाणी सोडण्यात येत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी नागठाण राखीव मतदारसंघाचे आमदार विठ्ठल कटकदोंड यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी 9 मे रोजी कालव्यात पाणी सोडण्याबाबत आदेश जारी केला आहे. आलमट्टी जलाशयातून मूळवाड आणि चिम्मलगी पाटबंधारे विभागातून तलावात पाणी सोडण्याची कारवाई करण्यात यावी, असे सांगितले. उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.

इंडी विभागाच्या कालव्यातून १३५ ते १७२ किलो मीटर पर्यंत पाणी सोडण्यात यावे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या भागात पाणीपुरवठा करण्यात आला नसून पिण्याच्या पाण्यासह जनावरांनाही मोठी समस्या निर्माण झाली आहे. येत्या चार दिवसात पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

इंडी विभागाच्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल कटकदोंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयातून बोलावून घेत याप्रश्नी लक्ष वेधले. येत्या चार दिवसात पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले असून या आश्वासनावर प्रशासन कितपत काम करेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: