Belagavi

खासबागमध्ये बसवेश्वर जयंती उत्सवाला सुरुवात

Share

संत बसवेश्वर जयंतीच्या औचित्याने खासबागमध्ये बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाचा उद्घाटन सोहळा निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा शाखा, मध्यवर्ती जगज्योती श्री बसवेश्वर जयंती समिती आणि विविध लिंगायत संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संत बसवेश्वर जयंतीच्या औचित्याने बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ बोलताना म्हणाले, संत बसवेश्वर हे केवळ समाजसुधारक आणि दूरदृष्टीकोन ठेवणारे राजा नव्हते तर नव्या समाजाची निर्मितीही त्यांनी केली आहे. सुमारे ८५० वर्षांपूर्वी त्यांनी समाजाला दिलेली सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि शैक्षणिक तत्वे आजही जगासाठी उपयुक्त ठरत आहेत. समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकासाठी, विशेषतः महिलांसाठी त्याकाळात केलेल्या सुधारणा आधुनिक काळातही अनुकरणीय आहेत. संत बसवेश्वरांनी वर्णभेद, धर्मभेद, जातीय भेद बाजूला सारून समाजाच्या एकत्रीकरणासाठी आदर्श घालून दिले, त्या आदर्शांचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांनी मनोगत व्यक्त करताना संत बसवेश्वरांच्या सिद्धांतांसंदर्भात माहिती दिली. ८०० वर्षांपूर्वी संत बसवेश्वरांनी दिलेले विचार आजही समर्पक असून आज संपूर्ण जग याच विचारांकडे वाटचाल करत आहे. अशा आदर्श मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी संत बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजिलेल्या उत्सवासंदर्भात माहिती दिली. चार दिवस चालणारा हा उत्साव सार्थकी लावण्यासाठी अनेक विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन आज पार पडले असून समाजातील सर्व संस्था सहकार्याने सेवा बजावत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी आशीर्वचन दिले.समतेचे प्रणेते असणारे संत बसवेश्वर यांनी समाजाचे नेतृत्व केले. त्यांची तत्वे आणि विचार आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संत बसवेश्वरांनी दिलेल्या विचारांचे बीज रोवणे गरजेचे आहे. संत बसवेश्वर उत्सव समितीने आयोजिलेल्या कार्यक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असल्याचेही मत स्वामींनी व्यक्त केले.

यावेळी प्राथमिक, माध्यमिक, पदवी, पदवी, पदव्युत्तर व सर्व वयोगटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व पारितोषिक प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ.एच.बी.राजशेखर, शंकरअण्णा विजापुरे, बसव जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुदेव पाटील, डॉ.दोडामणी, राजू कुंदागोळ, इरण्णा दयानवर, सुजित मुळगुंद, अण्णासाहेब कोरबू, भालचंद्र बागी, ​​प्रसाद हिरेमठ, वीणा नागमोती , रक्षा देगीनाळ, डॉ अप्पय्यानवरमठ, संजीव दोडमणी, रमेश कळसनवर, सोमलिंग माविनकट्टी आदी उपस्थित होते. राजू कुंदगोळ यांनी स्वागत केले तर एस.बी. तीगडी यांनी प्रास्ताविक केले. महेश गुरनगौडर यांनी आभार मानले. यावेळी उमादेवी निजगुली आणि शहापूर अक्का यांच्या समूहाने प्रार्थना गायिली.

Tags: