राज्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान पार पडले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
बेळगाव लोकसभा मतदार संघातील ८ विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम मशीन आर पी डी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये कडक सुरक्षेत दाखल करण्यात आल्या असून निवडणूक अधिकारी नितेश पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सील करण्यात आले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील ८ विधानसभा मतदार संघामधील ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रूमजवळ असलेल्या सर्व वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे. तसेच पोलिस सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे.
याठिकाणी ३ स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात सेंट्रल फोर्स, दुसऱ्या टप्प्यात स्थानिक पोलिस आणि तिसऱ्या टप्प्यात सीआरपीएफ पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. एकूण 08 विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून 4 जूनपर्यंत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.


Recent Comments