Belagavi

निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी विविध देशातील अधिकारी बेळगावात दाखल

Share

कर्नाटकात उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी आणि प्रक्रियेचे विविध टप्पे पाहण्यासाठी विविध देशांतील निवडणूक आयोगांचे प्रमुख अधिकारी दाखल झाले आहेत.

संपूर्ण देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पदर असून उद्या कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशातील निवडणूक अधिकारी बेळगावात दाखल झाले असून त्यांनी एकंदर निवडणूक प्रक्रियेची प्रशंसा केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, राज्यात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कंबोडिया, मोल्डोवा , नेपाळ, सिशेल, ट्युनिशिया आदी देशांतील निवडणूक आयोगांचे प्रमुख अधिकारी दाखल झाले असून त्यांनी आज निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेतली. संपूर्ण राज्यात केवळ बेळगावमध्ये हे अधिकारी दाखल झाले असून त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रशंसा केली, हि अभिमानाची बाब आहे.

कंबोडियाच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य हेल सराथ, कंबोडियाच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव हाऊट बोरीन, माल्डोव्हाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदस्या डाना मँटेनुआ, माल्डोव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्थानिक जिल्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख एड्रियन गमार्ता, नेपाळ निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार थापलिया, अवर सचिव थानेश्वरबुसाल, सेशेल्सचे निवडणूक आयोग प्रमुख डॅनी सिल्वा लुकास, सेशेल्सच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त निकोलस रॉस होरा, ट्युनिशिया उच्च निवडणूक आयोगाचे महम्मद तीली, ट्युनिशिया उच्च निवडणूक आयोगाचे प्रादेशिक संचालक जेल्लाली निबिन आदी अधिकाऱ्यांनी बेळगावमधील निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली.

यावेळी दाखल झालेल्या नेपाळच्या अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेची प्रशंसा केली. भारतात होणाऱ्या निवडणुकांची एकंदर प्रक्रिया, प्रसारमाध्यमानातून निवडणुकीसंदर्भात केले जाणारे विश्लेषण, निवडणूक प्रक्रियेचे नियोजन याचप्रमाणे प्रामुख्याने त्यांनी ईव्हीएम मशीन कार्यप्रणालीची प्रशंसा केली. ईव्हीएम मशीन मुळे होणारी वेळेची बचत, अचूकता याचप्रमाणे आर्थिक दृष्टीनेही ईव्हीएम मशीन निवडणुकीसाठी योग्य असल्याचे ते म्हणाले. भविष्यात भारतीय निवडणूक प्रक्रिया आणि विशेषतः ईव्हीएम मशीनचे अनुकरण आपल्या देशात करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विविध देशातील निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बेळगावमधील अधिकारी उपस्थित होते.

Tags: