बेळगाव जिल्ह्यात राज्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.
बेळगाव निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले आहेत.
यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी, बेळगाव जिल्हा मतदानासाठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे सांगितले. आज शहरातील वनिता विद्यालयात मस्टरींग साठी निवडणूक सेवेत तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्रित करून आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या असून त्यांच्यासाठी मूलभूत सुविधांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

बेळगाव, चिकोडी आणि कॅनरा लोकसभा मतदार संघात एकूण २६५०० कर्मचारी, १० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून एकूण ४५२८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची तपासणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व निवडणूक कर्मचारी आवश्यक ती सर्व माहिती जाणून घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.


Recent Comments