Bagalkot

काँग्रेस सरकार नाही तर वसुली गॅंग चालवत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर कर्नाटकात झंझावाती दौरा केला आहे. काल बेळगाव, शिरसी, दावणगेरे आणि हॉस्पेटमध्ये उमेदवारांच्या वतीने प्रचार करणारे नरेंद्र मोदी आज बागलकोटमध्ये पोहोचले. बागलकोट लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सीपी गड्डीगौडा आणि विजयपूरचे उमेदवार रमेश जिगजिनगी यांच्या वतीने मतयाचना केली .

कर्नाटकात काँग्रेस सरकार चालवत नाही, तर वसुली गॅंग चालवत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बागलकोट येथे आज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, काँग्रेस हे लुटारू सरकार आहे, एवढा मोठा देश या सरकारला द्यायचा का? असा सवाल त्यांनी जनतेला केला. काँग्रेस पक्षाने कर्नाटकात लुटमारीचे एटीएम बनवून अल्पावधीतच सरकारी तिजोरी रिकामी केली आहे. एक दिवस सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतील आणि तुमच्या मुलांवरही उपासमारीची वेळ येईल यात शंका नाही. कर्नाटकात लाखो कोटींचा टूजी घोटाळा करण्याची स्वप्ने काँग्रेस पाहत आहे.

कर्नाटकातील लुटारूंना 7 मे रोजी शिक्षा झाली पाहिजे आणि काँग्रेसचा भ्रष्टाचार संपला पाहिजे, असे मोदी म्हणाले. 10 वर्षात अंधारात असलेली 18,000 गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत पूर्वी फक्त 16% लोकांना पाणी मिळत होते पण आता पाच वर्षात 75% लोकांपर्यंत पाणी पोहोचत आहे. येत्या काही वर्षात भारताला जगातील टॉप 3 अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा संकल्प आहे, तुमच्या मतात भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याची ताकद आहे, असे ते म्हणाले.

2024 च्या निवडणुका भारताचे भविष्य ठरवतील, ही निवडणूक विकसित भारताच्या इच्छेची निवडणूक आहे. ते म्हणाले की, ही निवडणूक स्वावलंबी भारताच्या प्राप्तीची निवडणूक आहे. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा आमचा संकल्प असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही भारताला स्किल हब बनवू, असे ते म्हणाले. आमचे सरकार कर्नाटकात अनेक विमानतळ बांधत आहे. यातील एक विजयपुर येथेही तयार होत आहे. भागलपूर रेल्वे स्थानक, अमृत स्टेशन म्हणून विकसित केले जात आहे, भागलपूरमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग देखील रुंद केला जात आहे. यामुळे बदामी पट्टदकल्लू आणि ऐहोळे सारख्या ऐतिहासिक ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

 

 

Tags: