निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने भाजपकडून कोणत्याही विषयावरून राजकारण करण्यात येत असून हुबळी येथील नेहा हिरेमठ या युवतीच्या हत्येचेही राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप बेळगावमधील काँग्रेस नेत्यांनी केला.
आज बेळगावमध्ये हुबळी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत नेहा हिरेमठ ला श्रद्धांजली वाहण्यात आली.
काँग्रेसच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या निषेध मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी नेहा हिरेमठ हिला श्रद्धांजली वाहिली. नेहासोबत झालेले कृत्य हे विकृत मनोवृत्तीचे असून या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, महिलांवरील अन्यायाची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. काँग्रेस पक्ष महिलांसोबत आहे. नेहा हिरेमठच्या वडिलांनी या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र भाजपने या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर केल्याचे सांगत भाजपचा निषेध व्यक्त करत असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले.
आमदार राजू सेठ यांनी बोलताना, नेहा हिरेमठ हत्येचा निषेध नोंदविला. याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून याचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या निषेध मोर्चात आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील , काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, वकील आर. पी. पाटील, जयश्री माळगी, आयेशा सनदी आदींसह काँग्रेस नेते, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.


Recent Comments