तब्बल ३३ वर्षानंतर भरविण्यात आलेल्या बेनकनहळ्ळी, गणेशपूर येथील श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून मंगळवारी पहाटे अक्षतारोपण आणि विवाहविधी पार पडल्यानंतर भव्य रथोत्सवाला सुरुवात झाली.
महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमेवरील या गावाची महालक्ष्मी यात्रा आजपासून सुरु झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निसर्गरम्य परिसर असलेला हा भाग आज भंडाऱ्यात माखून गेलेला होता. सदर यात्रा पुढील ९ दिवस सुरु राहणार असून आज सायंकाळी श्री महालक्ष्मी गदगेवर विराजमान होणार आहे.
बुधवारपासून देवीची ओटी भरण्याचा कार्क्रम सुरु होणार आहे. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रस्ते यासह इतर मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिली.

समाजसेवक मोहनेश्वर गरग यांनी यात्रेबद्दल माहिती देताना, यात्राकाळात पुरविण्यात येत असलेल्या सुविधांबद्दल सांगितले. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करत यात्रेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यात्रेच्या पार्श्वभूमीवर या भागात झालेल्या विकासकामांचा आढावा ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मोहन सांबरेकर यांनी दिला.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी उत्तमरीत्या करण्यात आली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. या यात्रेचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments