रविवारी संध्याकाळी बेंगळुरूहून बेळगावला आलेल्या इंडिगोच्या विमानातील चालक दलाने तब्बल 22 प्रवाशांचे सामान बेंगळुरूमध्येच सोडून दिले. त्यामुळे बेळगावसह विविध भागातील प्रवाशांची तारांबळ उडाली.
इंडिगो विमान कंपनीच्या या गलथानपणामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे याच विमानातून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही प्रवास करत होते. आणि खरं म्हणजे त्यांच्या सामानाची बॅग देखील सापडली नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी हे विमान बेंगळुरूहून बेळगावला रवाना झाले. फ्लाइटमध्ये मलेशियन विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने प्रवासी होते. रात्री 7.30 वाजता विमान बेळगावला उतरल्यानंतर प्रवाशांना मोठा धक्का बसला. यादरम्यान तब्बल 22 प्रवाशांच्या बॅगा आल्या नाहीत, यामुळे मोठी गडबड उडाली.
याबाबत प्रवाशांनी विचारपूस केली असता, मलेशियन विद्यार्थ्यांच्या सामानाच्या बॅग मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे इतर प्रवाशांच्या बॅगा आणणे शक्य झाले नसून उद्या सामान पोच होईल, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त करत निषेध केला.
इंडिगो विमान कंपनीच्या या गलथान कारभाराबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मलेशियन विद्यार्थ्यांच्या बॅगमुळे इतर प्रवाशांच्या बॅग घेऊन येणे शक्य नव्हते तर तसे आधी कळविणे गरजेचे होते. विमानातून अनेक ज्येष्ठ नागरिक आणि इतर शहरातील प्रवासीही प्रवास करत होते. यादरम्यान औषधांसह जीवनावश्यक वस्तूदेखील बॅगमध्ये होत्या. ऐनवेळी अशी समस्या निर्माण झाली तर प्रवाशांनी काय करायचे असा सवाल यावेळी संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला.
वजनासह सर्व तपासण्यांनंतर, सामान जमा करून विमानात घेतले जाते. पण हा घोळ कशामुळे निर्माण झाला आणि याला जबाबदार कोण असाही सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
झालेल्या गोंधळानंतर प्रवासी रात्री विमानतळावरच ठाण मांडून बसले होते.. या बेजबाबदारपणावर फ्लाइट क्रू देखील चांगलाच संतापला होता. ज्या प्रवाशांना दुसऱ्या शहरात जायचे आहे आणि दुसऱ्या शहरातून आलेल्या प्रवाशांना मात्र विमानतळावर ताटकळत उभं राहावं लागलं.


Recent Comments