Belagavi

श्री रामनवमी निमित्त बेळगावमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन

Share

श्री रामनवमीनिमित्त श्री राम सेना हिंदुस्थानतर्फे बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावच्यावतीने बुधवारी (दि. १७) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. राणी कित्तूर चन्नम्मा चौकामार्गे कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे टिळकचौकाकडे शोभायात्रा मार्गस्थ झाली.

या शोभायात्रेत हजारो रामभक्तानी सहभाग घेतला होता. जय श्रीरामचे नारे देत रामभक्तांनी मिरवणुकीला रंगत आणली. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांसह सीता, हनुमान लक्ष्मण यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या रामभक्तांनी अनेकांचे लक्ष वेधले. ढोल ताशा, लेझीम तसेच जय जय श्रीरामचा अखंड गजर यामुळे शोभायात्रेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी फुलांची उधळण करून स्वागत केले जात होते. तसेच भगवे फेटे बांधून व भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे सर्व मार्गावर भगवामय वातावरण दिसून येत होते. शोभायात्रेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हि शोभायात्रा श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिण्यात आली होती.

Tags: