मालमत्ता कर भरून घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आज माजी नगरसेवक संघटनेने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना घरपट्टीतील सवलतीची मुदत महिनाभर वाढवून देण्याबरोबरच भरणा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ७ मेपर्यंत मुदत देण्याची मागणी केली.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महापालिकेने घरपट्टीचे ऑनलाइन चलन उपलब्ध करून देणे आवश्यक होते. शिवाय ५ टक्के सवलतदेखील देण्यात यावी, अशी मागणी आज माजी नगरसेवक असोसिएशनच्या वतीने मनपाकडे करण्यात आली आहे.
घरपट्टीचे ऑनलाइन चलन नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मनपाने उपलब्ध करून देणे आवश्यक होते, मात्र तसे न होता तांत्रिक समस्येमुळे ऑनलाइन चलन उपलब्ध होत नसल्याचे कारण देण्यात येत आहे. मागील 18 दिवसांपासून ही समस्या जैसे थे असून बेळगावातील मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत.
महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयामध्ये घरपट्टीचे चलन दिले जात असले तरी ते तयार करण्यास विलंब लागत असल्यामुळे नागरिकांना तेथे तासनतास उभे राहावे लागत आहे. मालमत्ता कर भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप याची माहिती मनपा आयुक्तांना देत या समस्येवर तातडीने तोडगा काढून मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी विनंतीही केली.
यावेळी शिवाजी सुंठकर, शिवनगौडा पाटील, रेणू किल्लेकर, दीपक वाघेला, संजय प्रभू आदींसह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.


Recent Comments