बेळगावात उद्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश आणि दलित संघटनांच्या नेत्यांनी आज आंबेडकर उद्यानाला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उद्या अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात येणार आहे. जयंतीचा मुख्य कार्यक्रम चन्नम्मा चौकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात होणार आहे. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, अन्य तयारी युद्धपातळीवर सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांनी आज शनिवारी आंबेडकर उद्यानाला भेट देऊन जयंतीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मल्लेश चौगुले, महादेव तळवार यांच्यासह दलित संघटनांचे नेतेही उपस्थित होते. त्यांनी तयारीसंदर्भात काही सूचना केल्या. त्या ऐकून आयुक्त लोकेश यांनी तुमच्या सूचनांनुसार सर्व आवश्यक सुविधा पुरवू, असे आश्वासन दिले.
दरम्यान, या संदर्भात बोलताना दलित नेते महादेव तळवार यांनी इन न्यूजला सांगितले की, बेळगावातील अशोक चौक किल्ला येथील महार बटालियन येथे उद्या सकाळी भीमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून सीबीटी, कसाई गल्ली, चव्हाट गल्ली, काकतीवेस मार्गे आंबेडकर उद्यानापर्यंत भीमज्योतीची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. नंतर दुपारी १२ वाजता शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून आंबेडकर जयंतीची भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येईल. खडेबाजार, मारुती गल्ली, शनिवार खूट आदी मार्गांवरून मिरवणूक काढून आंबेडकर उद्यानात सांगता होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता उद्यानात जाहीर कार्यक्रम होईल.

त्यात शिक्षिका प्रवीणा के. एस. यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. त्याशिवाय एससी-एसटी समुदायाच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. सरकारने काढलेल्या संविधान जथ्यात बेळगाव जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला आहे. त्यासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. बेळगावच्या आसपासच्या ग्रामीण भागात आंबेडकर जयंती ५-६ दिवस साजरी करण्याची प्रथा आहे. सर्वांनी मिळून जल्लोषात पण आचारसंहितेचे पालन करून आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले, महादेव तळवार, निंगाप्पा कांबळे, गणेश शिंगन्नावर, चंद्रकांत कोलकार, सुनील तळवार, कल्लाप्पा मैलन्नावर, यल्लाप्पा कोलकार आदी दलित नेते उपस्थित होते.


Recent Comments