सापडलेली 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग आधारकार्डवरील मोबाईल नंबरवर संपर्क साधून संबंधित मूळ मालक महिलेला परत करण्याचा दुर्मिळ प्रामाणिकपणा विजयपूर जिल्ह्यातील महिलेने दाखवल्याची घटना घडली आहे.
अफजलपूरहून बदामीकडे जाणाऱ्या KA 25 F 03 या सरकारी बसमध्ये ही घटना घडली. बसवन बागेवाडी ते बागलकोट असा प्रवास करणाऱ्या शिल्पा हिने सोन्याचे दागिने असलेली कॅरीबॅग बसमधील कॅरीअरवर ठेवली होती. त्यानंतर शारदा नामक महिला कुदरिसालवाडगी गावात जाण्यासाठी बसमध्ये चढली. एका लग्न समारंभासाठी शारदा आपल्या गावातून निडगुंदी येथे जात होती. निडगुंदी येथे तिच्या कॅरीबॅगऐवजी, शिल्पा बागेवाडीच्या सोन्याचे दागिने असलेली कॅरीबॅग घेऊन शारदा खाली उतरली. यावेळी शिल्पाही खाली उतरली. मात्र तिला कॅरीबॅग बदलल्याचे दिसले अन ती आपल्या मुलांसोबत बस स्टॉपवर रडत बसली. यावेळी शिल्पा बागेवाडी यांना मेहबूब वालेकर नावाच्या स्थानिक रहिवाशाने मदत केली.
112 पोलिसांना फोन करून या प्रकरणाची मेहबूब आणि मल्लय्या यांनी माहिती दिली. 112 हेल्पलाइनच्या गिरीश चलवादी, मल्लय्या मठ आणि शिवानंद मत्याळ या पोलिसांनी चौकशी सुरु केली. या दरम्यान, बसमधून खाली उतरलेल्या शारदाला त्या कॅरीबॅगमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पाहून आश्चर्याचा धक्का बसला. बसमधील कॅरीबॅग बदलल्याचे तिच्या लक्षात आले. कॅरीबॅगमध्ये असलेल्या शिल्पा बागेवाडीच्या आधारकार्डवर असलेला मोबाईल क्रमांक मिळवून शारदाने तिला फोन केला.
शिल्पाने पोलिसांसह शारदा राहत असलेल्या ठिकाणी जाऊन 35 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3 हजारांची रोकड परत मिळवली.
एकंदर,कॅरीबॅग बदलल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. अखेर हरवलेले 35 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3 हजारांची रोकड परत मिळाल्याने शिल्पाने खूश होऊन तिला मदत केल्याबद्दल मेहबूब आणि 112 हेल्पलाइन पोलिसांचे आभार मानले.


Recent Comments