कर्नाटकाच्या राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या उत्तम प्रजाकीय पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदार संघातून पक्षाने मल्लाप्पा चौगला यांना उमेदवारी दिली आहे.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लाप्पा चौगला यांनी सांगितले की, केवळ लोकांच्या कल्याणाचा उद्देश समोर ठेवून उत्तम प्रजाकीय पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मला बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. निवडणुकीत कोणीही आपले मत विकू नये, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदार संघातील जनतेने विचार करून मतदान करावे, चांगल्या लोकशाहीवादी उमेदवाराला मतदान करून विजयी केले तर मी काम करेन. आमचा पक्ष कोणाकडूनही पैसे गोळा करत नाही, कार्यकर्ते नाहीत, प्रदेश कार्यालये नाहीत.
निवडून आल्यास मी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खासदार कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे मल्लाप्पा चौगला यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत नेगीलयोगी राज्य रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील, निवृत्त वनाधिकारी अप्पाण्णा, श्रीनिवास आदी उपस्थित होते.


Recent Comments