दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद न देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांचे स्वागत न करण्याचे आवाहन राज्य शेतकरी संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष कुरुबुरु शांतकुमार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरुबुरु शांतकुमार म्हणाले, भीषण दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहेत. राजकारणी निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी गावोगावी आले तर त्यांचे जंगी स्वागत करू नका. गुरांना चारा नाही. राज्यातील 40 लाख कृषी बोअरवेलपैकी 10 लाख कोरड्या पडल्या आहेत. विजेची समस्या आहे. त्यावर राजकारणी काहीच उपाय न काढता सत्तेसाठी आटापिटा करत आहेत. म्हणून त्यांना हुसकावून लावा.
सरकारने सर्व बँका आणि सहकारी संस्थांना दुष्काळामुळे कृषी कर्ज वसूल न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून कर्जवसुली सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला. बेळगावसह राज्यातील 80 साखर कारखान्यांकडून 5 कोटींचा ऊस काढण्यात आला असून, साखर कारखान्यांकडून 2600 कोटी रुपये इतकी बिले थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी, दावणगेरे रयत संघाचे अध्यक्ष रवी कुमार, बेळगाव रयत संघाचे अध्यक्ष गुरुसिद्धाप्पा, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments