Belagavi

हलगा-मच्छे बायपाससंदर्भात शेतकऱ्यांची बैठक

Share

हलगा-मच्छे बायपासमध्ये जमीन जाणार असलेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरण, प्रशासन, अधिकारी वा दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता, कोणत्याही परिस्थितीत देऊ केलेली भरपाई स्वीकारू नये, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष व म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

प्रस्तावित हलगा-मच्छे बायपास खटल्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या स्टे बद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी येळ्ळूर रोड येथे शिवारात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत बायपासवरून कोर्टात दाखल केलेल्या खटल्याच्या सध्याच्या परिस्थितीची आणि कोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशाची माहिती देऊन जागृती करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, उच्च न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय टाकू नये अथवा त्यांच्या पिकांची नासधूस करु नये असा स्पष्ट आदेश दिला असताना महामार्ग प्राधिकरणाने कांही खोटी कारणे देत 14 मार्चपासून बायपासचे काम सुरु ठेवले होते. मा. उच्च न्यायालयाने दाव्याचे जजमेंट पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करु नये म्हणून 4 एप्रिल 2024 रोजी तत्काळ स्थगिती दिल्याने थांबले आहे. त्यासाठी बायपास रद्द होईस्तोवर पुढील लढाई सुरुच ठेवण्यासाठी आज येळ्ळूर रोड बायपास वरील शेतीत शेतकऱ्यांची बैठक घेत आहोत. बायपासमध्ये जमीन जाणाऱ्या व इतर शेतकऱ्यांनी सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता दाव्याचा निकाल लागेस्तोवर ठाम रहावे.

कारण विजय तुमचाच होणार आणि पिकांची संपूर्ण नुकसानभरपाईही मिळणार आहे, असे शेतकऱ्यांचे वकील रविकुमार गोकाककर यांनी विश्वासपुर्वक सांगितले आहे. तरीही कांही शेतकरी भरपाईसाठी प्रयत्न करत आहेत ते सर्वस्वी चुकीचे आहे. महामार्ग प्राधिकरणाने कितीही प्रयत्न केलेतरी ते कदापी यशस्वी होणार नाहीत. पण त्यासाठी शेतकरी आपल्या शेती देण्याविरोधात भक्कमपणे उभे असले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या ठामपणावरच आजपर्यंत तत्काळ स्थगिती आदेश मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

समिती नेते रमाकांत कोंडूसकर यांनी शेतकऱ्यांना समजाऊन सांगत रिंगरोड, बायपास, खादरवाडी जमीन प्रकरण व इतर भूसंपादन रोखण्यासाठी लोकसभा निवडणूकीनंतर सर्वानी मिळून प्रचंड असा शेतकऱ्यांचा बैलगाडी, ट्रॅक्टर आणि जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी सिध्द रहायच आहे. तरच इथला अल्पभूधारक शेतकरी वाचेल व त्यांच्या पुढच्या पिढ्यासाठी संरक्षण मिळणार आहे. अन्यथा विकासाच्या नावे शेतकऱ्यांना भकास करुन विकास काय कामाचा हे दाखवून देणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले.

सध्या, बायपासचे काम बंद आहे. पण येळ्ळूर रोडवर व अलारवाड जवळ निवडणुकीसाठी उभारलेले तपासणी नाके चुकवत खासगी वाळू, विटा, दुधाच्या व इतर वाहने दिवसा व रात्री तेथून जात असतात. ती शेतकऱ्यांनी अडवून येथून पून्हा गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा देण्यात आला.

Tags: