Belagavi

हा घ्या माझा बेळगावातील पत्ता! शेट्टर यांनी हेब्बाळकरांच्या मतदारसंघात घेतले नवे घर

Share

तुमचा बेळगावातील पत्ता सांगा म्हणणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना, त्या प्रतिनिधीत्व करत असलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघात नवीन घर घेऊन भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी हेब्बाळकर यांच्यावर कृतीतून पलटवार केला आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेट्टर यांनी गृहप्रवेश केला.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव येथील कुमारस्वामी लेआउटमध्ये दोन मजली घर भाड्याने घेतले आहे. आज युगादी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी शेट्टर यांनी नव्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच जगदीश शेट्टर कुटुंबीयांनी विशेष पूजा केली. विशेष म्हणजे, अगदी पारंपरिक पद्धतीने दूधही उतू घातले.

यावेळी जगदीश शेट्टर यांच्या समवेत पत्नी शिल्पा शेट्टर, खासदार मंगला अंगडी, सून श्रद्धा शेट्टर, मुलगा संकल्प उपस्थित होते.
‘जगदीश शेट्टर हे बाहेरचे आहेत, तुमचा बेळगावातील पत्ता सांगा’ असे आव्हान मंत्री हेब्बाळकर यांनी त्यांना दिले होते. त्यावर आता जगदीश शेट्टर बेळगावात नवे घर करून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना तोंडघशी पाडले आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले की, आज युगादी सणाच्या पार्श्वभूमीवर मी नव्या घरात प्रवेश केला आहे. मी बेळगावात माझे कार्यालयही उघडणार आहे. मी विरोधकांना उत्तर दिलेले नाही. त्यांनी टीका करण्याआधीही मी घर बनवणार म्हटल्याप्रमाणे बनवले.

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना, काँग्रेस पक्षात गेल्यावर त्यांनी माझे विधान पाहिले नाही असे मला वाटते. मी मोदी, येडियुरप्पा, भाजप पक्षावर कधीही टीका केलेली नाही, फक्त खोटी विधाने करू नका. लोकसभा निवडणूक ही वादविवाद करायची निवडणूक नाही. मी त्यांच्यावर टीका करत नाही, ते टीका करत असतील. कारण टीका करून ते मोठे होऊ शकतात. पण, मी त्यांच्यावर टीका करणार नाही. टीका सोडून तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांबद्दल सांगा, काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण? शेट्टर यांनी लक्ष्मी यांना प्रत्युत्तर दिले की इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण आहेत?, टीका करणे थांबवा आणि मला सांगा तुमचा नेता कोण आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

बेळगावातील जनतेच्या प्रतिसादाबाबत बोलताना शेट्टर म्हणाले की, मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळत आहे हे खरे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल अशी अपेक्षाही केली नव्हती. सर्वच क्षेत्रात मोठा पाठिंबा मिळत आहे. पंचमसाली मतांच्या राजकारणावर बोलताना, लोकसभा निवडणुका राष्ट्रीय अजेंड्यावर होणार आहेत. ही जात-धर्मावर आधारित निवडणूक नाही, असे जगदीश शेट्टर म्हणाले.

Tags: