श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेला संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. त्यानंतर आज फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 335व्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.
क्रूरकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांना फंदफितुरीने पकडल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नरक यातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुऱ्हाडीने तुकडे-तुकडे करून अत्यंत हाल-हाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रासुद्धा निघाली नाही. इतके दाहक आणि दिव्य बलिदान संभाजी महाराजांचे आहे. त्यांचे हे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी आहे. याची जाणीव हिंदू समाजाला रहावी आणि त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात आज मूक पदयात्रा काढून संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला विधिवत मंत्राग्नि देण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते ज्वालेच्या मुकपदयात्रेला चालना देण्यात आली. ही मूक पदयात्रा एसपीएम रोड, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंग खिंड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. प्रांत प्रमुख किरण गावडे व जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नंतर संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून, मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी छत्रे गुरुजी, रवी जोशी यांनी त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतीकात्मक चितेचे दहन करण्यात आले. या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. वक्ते म्हणून प्रचारक तथा कणबर्गी विभाग प्रमुख हिरामनी मुचंडीकर यांनी धर्मवीर बलिदान मास का पाळावा?, तसेच आजचा हिंदुसमाज या विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित शिवभक्तांना भारावून सोडले. गजानन निलजकर यांनी सर्व धारकऱ्यांना भारत मातेची प्रतिज्ञा दिली. शेवटी ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावर्षी तब्बल 145 विभागात ज्वाला देण्यात आली. यात संपूर्ण तालुका तसेच सिंधुदुर्ग, डिचोली, दोडामार्ग, गोकाक, चंदगड, रायबाग या भागात ही ज्वाला वितरित करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाणाचे, अमोल केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, गजानन पाटील, गजानन पवार, अभिषेक निलजकर, रामकृष्ण शिवाजी मंडोळकर, गिरीश खन्नूकर, अमित लगाडे, अभिजीत अष्टेकर, मल्लेश बडमंजी, जोतिबा चोपडे, युवराज पाटील, अंकुश केसरकर राम सुतार, मारुती पाटील, विनायक कोकितकर, तुकाराम पिसे, शंकर भातखंडे, दिगंबर कातकर विजय कुंटे, बाळू सांगूकर, महेश गावडे, संकेत सुतार, प्रफुल्ल शिरवळकर, उदित रेगे, गिरीश पाटील, अजित जाधव, संतोष कुसाने, अजित बांदेकर, प्रवीण घागवे, प्रमिला, रेखा चौगुले, मनीषा चौगुले, सुलोचना शिनोळकर, ईशा निलजकर, दीपा पवार, गौरी गवाने, मिथिला पाटील तसेच शेकडो धारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments