Belagavi

काँग्रेसला दलित-मागासवर्गीयांचा पाठिंबा जाहीर

Share

शोषित समाजाच्या बाजूने असलेल्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेत राज्यात या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

बेळगावात आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दलित नेते मल्लेश चौगुले व बाळेश बनहट्टी यांनी या निर्णयाची माहिती दिली. यावेळी बोलताना बनहट्टी म्हणाले की, राजकीय जागृतीसाठी शोषित समाजाच्या बाजूने असलेल्या पक्षाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. काँग्रेसची सत्ता आल्यास संविधानाचे जतन व विकास होईल, असे बाळेश बनहट्टी म्हणाले. केंद्रातील भाजप सरकार संविधान बदलणार आहे, असा दावा करणारा भाजप हा दलितविरोधी पक्ष आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांचा पुरस्कार करणारे असून, भाजपचे वक्तव्य आपल्या समाजाचा अपमान करणारे आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.  मल्लेश चौगुले यांनी, ही निवडणूक मनुवाद आणि संविधान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची दिशा ठरवणारी असल्याचे सांगितले. आपले प्रत्येक मत संविधानाच्या बाजूने टाकले पाहिजे. संविधान टिकवण्यासाठी झटणाऱ्या पक्षाला पाठिंबा द्यायला हवा. बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि चिक्कोडीमध्ये प्रियंका जारकीहोळी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला सुरेश सुन्नक्की, गीता सुन्नक्की, मंजुनाथ अन्नय्या आदी उपस्थित होते.

Tags: