Banglore

आमच्या पाच गॅरंटीवर आहे पाच वर्षांची वॉरंटी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

मी यापूर्वीही काही मतदारसंघात प्रचार केल्याचे लोकांनी पाहिले आहे. मी चामराजनगर, म्हैसूर-कोडगू आणि चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. भाजप नेते खोट्याचा प्रचार करतात पण काँग्रेस सत्यावर प्रचार करेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठासून सांगितले.

कोलार येथील कुरुडूमले विनायक मंदिरात प्रार्थना करून सिद्धरामय्या यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आमचे लोकसभेचे उमेदवार गौतम सज्जन व्यक्ती आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागाळातून पुढे आलेले ते आता उमेदवार आहेत. ते प्रचंड बहुमताने विजयी होवोत. तुमचे सर्व सहकार्य आणि आशीर्वाद गौतम आणि काँग्रेस पक्षाला असायला हवे, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, खते, स्वयंपाकाचे तेल, डाळी, भाजीपाला यांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटुंब अडचणीत आले. या त्रासावर उपाय म्हणून, आम्ही पाच गॅरंटीची आश्वासने जाहीर केली. सत्तेत आल्यानंतर आम्ही पाचच्या पाच गॅरंटी लागू केल्या.

सुरुवातीला गॅरंटीची अंमलबजावणी शक्य नाही, असा खोटारडा प्रचार भाजपने केला. हमी लागू झाल्यानंतर त्यांनी नवा लबाड प्रचार सुरु केला आहे. गॅरंटी बंद होतील, असे ते सांगत सुटले आहेत. आमच्या गॅरंटी कोणत्याही कारणास्तव थांबणार नाहीत. काँग्रेसच्या गॅरंटीसाठी पाच वर्षांची वॉरंटी आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

पराभवाच्या भीतीने भाजपने रचलेल्या खोट्या गोष्टींना बळी पडू नका. भाजप हा खोट्याचा कारखाना आहे. आम्ही दिलेला शब्द पाळत तुमच्या मताचा सन्मान केला. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला विजयी करून तुमच्या मताला किंमत मिळेल, अशा पद्धतीने सरकार काम करेल, असेही ते म्हणाले.

Tags: